मधाचे फायदे
मध
मध हे केवळ औषध नसून ते दुधाप्रमाणे पौष्टीक व संपूर्ण खाद्य आहे. मधातील लोह वगैरे क्षार रक्तात आम्लविरोधी बनवतात. मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होऊन रक्ताचा फिकटपणा दूर होतो. मधामुळे उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधामध्ये 'बी' जीवनसत्व चे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवनाने त्वचा विकार उद्भवत नाहीत. आहारात जेथे जेथे साखर व तुपाचा वापर केला जातो तेथे तेथे मधाचा उपयोग करता येतो. मध नुसता किंवा भाकरी बरोबर खाता येतो.लहान मुले अशक्त लोक व वायू असणाऱ्यांना मध सेवन करणे फायदेशीर असते. रोज दोन ते चार तोळे मध सेवन केल्याने हृदय सुदृढ बनते.मधाचे सेवनाने चरबी कमी करण्यासाठी पाण्यात थोडा मध व लिंबाचा रस घालून दीर्घकाळ पिणे आवश्यक असते.
खरा मध ओळखण्यासाठी मधात कापसाची वात बुडवून ती पेटवले असता आवाज न करता ती पेटत राहिली तर तो अस्सल समजावा.कुत्रा अस्सल मद खात नाही तसेच चोळून ठेवलेल्या खाद्य पदार्थ तो शिवतही नाही. अस्सल मधाचा एक थेंब पाण्यात टाकला असता तो तळाशी जाऊन बसतो.
मध जसजसा जुना होईल तसतसा गुणकारी बनतो. एक कप दुधात एक चमचा मध घालून पिल्याने शक्ती वाढते. दोन चमचे मध व एक चमचा लिंबू रस एकत्र करून सकाळ-संध्याकाळ घेतल्याने रक्ताचा दाब कमी होतो. मध व पाणी एकत्र करून गुळण्या केल्याने टॉन्सिल बरे होतात. तसेच तोंड येणे, तोंडात वृण पडणे, तृषाविकार इ. तोंडाचे विकार दूर होतात. तोंड स्वच्छ होते. सकाळी एक ग्लास पाण्यात व रात्री दुधात एक चमचा मध घालून पिल्याने मलावरोध दूर होतो.
मध गरम करू नये, गरम पदार्थात सुद्धा घालू नये कारण मधास उष्णता सहन होत नाही. तो विषयाप्रमाणे हानिकारक बनतो. मधाचे सेवन केल्यावर गरम पाणी सुद्धा पिऊ नये. तसेच मध व तूप सम प्रमाणात सेवन करणे हे सुद्धा विषाप्रमाणे आहे. दोन्ही एकत्र करून घ्यायचे असेल तर त्याचे प्रमाण विषम असावे.
अतिरिक्त प्रमाणात सेवन करू नये. दीर्घकाळपर्यंत जास्त प्रमाणात मध घेणे जीव घेणारे किंवा अत्यंत हानिकरक असते.मुलांना 20 ते 25 ग्रॅम व प्रौढ माणसांना 40 ते 45 ग्रॅम पेक्षा अधिक मध एकाच वेळी घेऊ नये ज्याच्या पोटात विष गेले असेल अशा व्यक्तीस मध देऊ नये अन्यथा विषाचा प्रकोप वाढुन तो तात्काळ मृत्यू पावतो.

Comments
Post a Comment